अहमदाबाद :- आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून (दुपारी 2 वाजता) येथे प्रारंभ होत आहे. गतविजेता इंग्लंड व सर्वाधिक वेळा उपांत्य व अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंड यांच्यात आज सलामीचा सामना होणार आहे. सामना जरी या दोन संघात होत असला तरीही चर्चा यजमान भारतीय संघाच्याच संभाव्य विजेतेपदाची रंगत आहे.
भारतातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गतविजेता इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा सलामीचा सामना रंगणार आहे. या सान्यात न्यूझीलंड संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासलेले असल्याने सामन्यात इंग्लंडचेच पारडे जड राहण्याची अपेक्षा आहे.
1975 सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंडने एकदाही विजेतेपद मिळवले नव्हते. ही उणीव त्यांनी पंचांच्या चुकीच्या निर्णयाच्या जोरावर 2019 साली भरून काढली व विश्वकरंडक जिंकला. त्यांच्या संघाचे नेतृत्व यंदा जोस बटलर करत असून न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन याला दुखापत झाल्याने या सामन्यापुरते संघाचे नेतृत्व टॉम लॅथम करणार आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर समसमानच आहे. मात्र, प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत थाटात प्रारंभ केल्यावर नंतर कामगिरी खालावलेल्या न्यूझीलंडकडून जास्त सरस खेळाची अपेक्षा आहे. न्यूझीलंडच्या संघाने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा या स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य तसेच अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना विजेतेपदापासून दूर राहावे लागले आहे.
दोन्ही संघ या मैदानावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेचा सलामीचा सामना खेळत आहेत. दोन्ही संघांची फलंदाजी व गोलंदाजी समसमानच असल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा होईल अशी अपेक्षा आहे. त्यातही न्यूझीलंडच्या संघाचे विल्यमसनसह अन्य काही प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांची सर्व मदार खरेतर गोलंदाजीबाबत टीम साउदीवर होती. मात्र, त्यालाच अद्याप दुखापतीतून बाहेर येता आलेले नसल्याने इंग्लंडच्या मानाने त्यांची गोलंदाजी काहीशी दुबळी ठरू शकते. दुसरीकडे इंग्लंडचा संघ भरात आहे, त्यांनी नुकतेच न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकत विश्वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखले दिले आहेत. न्यूझीलंडचे अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळले असल्याने त्यांना येथील खेळपट्ट्यांचा अंदाज आहे. मात्र, इंग्लंडचा संघ गेल्या तीन वर्षांपासून भारतात खेळलेला नाही त्यामुळे या सामन्यात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा त्यांच्या फिरकी गोलंदाजांकडूनच त्यांना जास्त धोका आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
वेळ – दुपारी 2 वाजल्यापासून
ठिकाण – नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
दरम्यान, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून येथे प्रारंभ होत आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना जरी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात होत असला तरीही त्यापूर्वी कोणताही उद्घाटन सोहळा होणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. हा सोहळा औपचारिकतेनुसार 14 ऑक्टोबरला याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत व पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी होणार असल्याचेही बीसीसीआयने जाहीर केले आहे.
Eyes are on the prize ahead of the @cricketworldcup 💥#CWC23 pic.twitter.com/xH7KBTEHSI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 4, 2023
अरजीत सिंग, रणबीर कपूर यांच्या समवेत प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या कार्यक्रमाद्वारे या स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, आता ही योजना रद्द केल्याचे बोलले जात आहे. अर्थात याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही. मात्र, तिकीट विक्रीबाबत झालेला गोंधळ, सामन्यांच्या तारखांबाबत सातत्याने बदलत जाणारे वेळापत्रक व अनेक आजी माजी खेळाडूंनी केलेली टीका यामुळेच हा सोहळा होणार नसल्याचे सांगितले जात आहे