World Cup 2023 IND vs AUS Match :- एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानात सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात गुंडाळले. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध 49.3 षटकांत 199 धावांत गारद झाला.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा राहुलनं नुकतंच अर्धशतक लगावले असून भारताच्या 30 षटकात 3 बाद 120धावा झाल्या असून विजयासाठी आणखी 80 धावांची गरज आहे. सध्या क्रीजवर विराट कोहली 60*(90) आणि केएल राहुल 54*(81) धावांवर खेळत आहेत.
विजयासाठी 200 धावांचा पाठलाग करताना या सामन्यात भारताचे पहिले तीन फलंदाज (Rohit Sharma ,Ishan Kishan ,Shreyas Iyer) खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला,अन् टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर पुन्हा आणून ठेवलंय.
कोहली पाठोपाठ राहुलनं अर्धशतक झळकावलं आहे. लोकेश राहुलने 72 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 16 वे अर्धशतक आहे. त्याने विराट कोहलीसोबत शानदार शतकी भागीदारी करत टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन केले आहे. आता मोठा डाव खेळून टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
त्याआधी, विराट कोहलीने 75 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील 67 वे अर्धशतक आहे. 12 धावांच्या स्कोअरवर त्याला जीवदान मिळाले. तेव्हापासून तो अत्यंत सावधपणे खेळला आहे आणि सहज धावा काढत आहे.