मुंबई – अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण तानाजी सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. असाच कारभार सध्या सुरू आहे. म्हणूनच तर शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू होत असताना तानाजी सावंत स्वतःचाच विचार करत आहेत.
रुग्णांच्या मृत्यूंबाबत मला काहीच विचारू नका, असे राज्याचे आरोग्य मंत्रीच म्हणत आहेत. मग राज्यातील शासकीय रुग्णालयांची जबाबदारी कोणाची?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी केला.
राज्यातील शासकीय रुग्णालयांत होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार नाही, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. तसेच, अवघे मंत्रिमंडळ या मृत्यूंना जबाबदार आहे, असेही ते म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर रविवारी आमदार पवार यांनी सडकून टीका केली. दरम्यान, शरद पवार यांनी सभेत आपले फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई केली आहे.
त्यामुळे आता अजित पवारांच्या नाशिक सभेत शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यावर रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांनाच आपले गुरु मानले आणि त्यांच्या प्रेरणेनेच राजकारण केले.
आता शरद पवार साहेबांचा फोटो वापरता येईना म्हणून अजित पवार यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावत आहेत. आता चुकीच्या पद्धतीने काम केले तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या फोटो समोर बसून केले तरी चालेल, असा अप्रत्यक्ष चिमटा रोहित पवारांनी अजित पवारांना काढला.
नेहमीच पुन्हा करू..
वेळ आली तर अजित पवारांनाही मुख्यमंत्रीही करू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावरही रोहित पवारांनी टोला लगावला आहे.
ते म्हणाले, आत्ताच मुख्यमंत्री करू, आत्ताच न्याय मिळवून देऊ, आत्ताच मृत रुग्णांना मदत करू, असे ते म्हणणार नाहीत. पुन्हा कधी तरी मुख्यमंत्री करू असेच ते म्हणणार. नेहमीच पुन्हा करू असे त्यांचे म्हणणे असते. यापूर्वीही त्यांनी पुन्हा या शब्दावर जोर दिला होता.
छगन भुजबळांनी विसरू नये
मी राष्ट्रवादीचा संस्थापक प्रांताध्यक्ष होतो. पक्षवाढीसाठी माझेही योगदान आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी थेट शरद पवारांवर केली होती. भुजबळ यांच्या टीकेचा रोहित पवार यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले, आज भुजबळ काहीही बोलतील, पण त्यांनी हे विसरू नये, त्यांनाच पवार साहेबांनी अनेक मंत्री पदे दिलेली आहेत, आज हे लोक वडिलांनाच घरातून बाहेर काढू पाहात आहेत. शरद पवार हुकूमशाही पद्धतीने काम करतात असे म्हणणे अशोभनीय आहे.