Photo Of Mitchell Marsh Resting His Legs On World Cup Trophy : आयसीसी क्रिकेट विश्वचषक2023 च्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. ट्रॉफी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष झाला. या सेलिब्रेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला एक फोटो व्हायरल झाला. यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच नाराजी पसरली.
जागतिक क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंनीही मार्शच्या या कृतीला चुकीचे म्हटले आहे. याबाबत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सुध्दा आपली प्रतिक्रिया दिली आहे. शमी म्हणाला की, मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रुममध्ये विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवल्याचे पाहून मला वाईट वाटले.
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, “मी दुखावलो आहे. ज्या ट्रॉफीसाठी जगातील सर्व संघ लढतात, जी ट्रॉफी तुम्हाला डोक्यावर घ्यायची असते, त्या ट्रॉफीवर पाय ठेवताना पाहून मला अजिबात आनंद होत नाही. ती कृती पाहून मला वाईट वाटले.
35 वर्षीय Mohammed Shami खेळाडूने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 57 धावांत 7 बळी घेत विक्रमी कामगिरी देखील केली होती.
दरम्यान, शमीला पहिल्या काही सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागले होते. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असताना त्याला संधी मिळाली. यावर शमी म्हणाला, “जेव्हा तुम्ही चार सामन्यांसाठी बेंचवर बसता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनता. कधी-कधी तुमच्यावर दबाव येतो, पण जर संघ चांगली कामगिरी करत असेल तर त्यातून तुम्हाला समाधान मिळते.