World Cup 2023 England vs Sri Lanka Match Results : वर्ल्ड कप 2023 चा 25 वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. श्रीलंकेने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव करत मोठा उलटफेर केला आहे . या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. या विश्वचषकातील पाच सामन्यांमधला इंग्लंडचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे या पराभवासह गतविजेता इंग्लंड संघाचं जवळपास पॅकअप झालेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 33.2 षटकांत 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 25.4 षटकांत दोन गडी गमावून 160 धावा केल्या आणि सामना आठ विकेटने जिंकला.
विजयासाठी 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. कुसल परेरा चार धावा करून बाद झाला. यानंतर कुसल मेंडिसही 11 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. 23 धावांवर दोन गडी गमावल्याने श्रीलंकेचा संघ अडचणीत आला असता, पण पथुम निसांका आणि सादिर समरविक्रमा यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. निसांकानं 83 चेंडूत 1 चौकार अन् 2 षटकारासह सर्वाधिक नाबाद 77 धावांची तर सदीरा यानं 53 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 64 धावांची खेळी करत विजय साकारला. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने 5 षटकात 30 धावा देताना दोन विकेट घेतल्या.
A comprehensive win for Sri Lanka as we beat defending champions England by 8 wickets! 🦁👏 #LankanLions on the march! 👊#SLvENG #CWC23 pic.twitter.com/4jURXysvzn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 26, 2023
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 156 धावांवर गारद झाला. 2019 मध्ये विश्वविजेता बनलेल्या संघासाठी हा विश्वचषक खूपच वाईट ठरला आहे. या सामन्यातही हा संघ केवळ 33.2 षटकेच खेळू शकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान या जोडीने वेगवान सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. मालन 28 धावा करून अँजेलो मॅथ्यूजचा बळी ठरला. मात्र, यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. जो रूट तीन धावा करून धावबाद झाला. बेअरस्टोला 30 धावांवर कसून राजिथाने बाद केले. कर्णधार बटलर आठ धावा करून तर लिव्हिंगस्टोन एक धावा करून बाद झाला.
85 धावांत पाच गडी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ संघर्ष करत होता. मात्र, बेन स्टोक्स एका टोकाला उभा होता. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांकडून बुद्धिमान फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. इंग्लंडचे फलंदाज खराब फटके खेळून विकेट्स देत राहिले. मोईन अली 15, ख्रिस वोक्स 0 आणि आदिल रशीद 2 धावा करून बाद झाले. दरम्यान, बेन स्टोक्सही वैयक्तिक 43 धावांवर खेळत राहिला. रशीदने निष्काळजीपणामुळे विकेट गमावली. शेवटी मार्क वुडही पाच धावा करून बाद झाला. विली 14 धावा करून नाबाद राहिला.
श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने 7 षटकात 35 धावा देताना सर्वाधिक तीन बळी घेतले. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मॅथ्यूजनं 5 षटकात 14 तर रजिताने 7 षटकात 36 धावा दिल्या. तिक्ष्णाने एक विकेट घेतली, त्यानं 8.2 षटकात 21 धावा दिल्या.