World Cup 2023 Pakistan vs South Africa : पाकिस्तान संघ कधी काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही, असे क्रिकेटविश्वात बोलले जाते. एके दिवशी ते विजेतेपदाचे दावेदार मानले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्याचा कमकुवत संघाकडून पराभवही होऊ शकतो. विश्वचषकासारख्या स्पर्धेत फॉर्मात असणे पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहे आणि जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही हे कर्णधार बाबरला माहीत आहे.
पराभवाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘करा किंवा मरो’ चा सामना खेळावा लागणार आहे. यात पराभूत झाल्यास पाकिस्तान आता इथून वर्ल्ड कप सोडा सेमीफायनल गाठेल, याची शक्यता कमी झालीये, पण त्याचबरोबर बाबर आझमचे कर्णधारपदही जाऊ शकते. पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या बाबरला या सामन्यात पराभूत होण्याचे नशीब काय असू शकते, हे माहीत आहे. यापुढे पाकिस्तानला प्रत्येक सामना जिंकायचा आहे आणि ऑस्ट्रेलियाने उरलेल्या चारपैकी किमान दोन सामने हरावेत अशी प्रार्थनाही केली पाहिजे.
पाकिस्तानच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे पाच सामन्यात फक्त 2 विजयाच्या 4 गुणांसह पाकिस्तानचा संघ अंकतालिकेत सहाव्या स्थानी आहे. सध्या पाकिस्तानचा रनरेट -0.400 असा आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचं आख्खं गणित बिघडलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाकिस्तानचा आगामी सामना 27 ऑक्टोबरला खतरनाक फॉर्ममध्ये असणाऱ्या दक्षिणआफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे बाबरने आत्ताच हत्यारं टाकली असतील, अशी चर्चा आहे. अफ्रिकेविरुद्धचा विजय पाकिस्तानला जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, बांगलादेशसोबत होणारा 31 ऑक्टोबरचा सामना पाकिस्तानसाठी संजिवनी ठरू शकेल. पाकिस्तानसमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते न्यूझीलंडचं. 4 नोव्हेंबरला होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. तर 11 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी उर्वरित 4 पैकी 3 सामने खडतर असतील हे मात्र नक्की…
दक्षिण आफ्रिका संघ अप्रतिम फॉर्ममध्ये…
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सकडून धरमशाला येथे पराभव झाला असला तरी दोन्ही संघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. क्विंटन डिकॉक आणि हेनरिक क्लासेन यांच्या फलंदाजीत सातत्य असून ते चांगल्या धावा काढत आहेत. क्विंटन डिकॉकने आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर मधल्या फळीत इडन मार्करामनेही चांगली फलंदाजी केली आहे. सरतेशेवटी, मार्को यान्सनही वेगाने धावा करण्यात माहिर आहे. गोलंदाजीत रबाडा, लुंगी अँगिडी आणि मार्को यान्सन हे त्रिकूट आहे.
पाकिस्तान संघ सपशेल अपयशी..
दुसरीकडे, मोहम्मद रिझवान वगळता पाकिस्तानचे इतर फलंदाज आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजीत फ्लॉप ठरला आहे, तर हरिस रौफलाही छाप पाडता आलेली नाही. पाकिस्तानला नसीम शाहची उणीव भासत आहे. हसन अली हा वनडेसाठी योग्य गोलंदाज नाही, त्यामुळे जमान खान किंवा मुहम्मद वसीम ज्युनियरला मैदानात उतरवता येईल.
बाबरचे भवितव्य विश्वचषकातील कामगिरीवर ठरणार…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी संकेत दिले की, सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानी संघ अपयशी ठरल्यास बाबर आझम कर्णधारपद गमावू शकतो. कर्णधार बाबर आझम आणि मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांना 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची तयारी करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे विश्वचषकातील संघाची कामगिरी लक्षात घेऊन बोर्ड जे काही निर्णय घेईल ते पाकिस्तान क्रिकेटच्या हिताचे असतील, असे पीसीबीने म्हटले आहे.