पुणे – कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्कमधील अधिकारी आणि पुणे शहर आणि जिल्ह्यात एस. के म्हणून नावलैकिक मिळवणारे “सतीश कुलकर्णी’ यांचे आज (रविवारी) निधन झाले आहे. त्यांना कोरोना झाला होता. दत्तवाडी परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेताना सतीश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतला.
कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सन 1990 मध्ये रूजू झालेल्या सतीश कुलकर्णी यांचे शिक्षण सर परशुराम महाविद्यालयातून झाले होते. पुण्याच्या कस्टम आयुक्तालयात आणि संपुर्ण पुणे शहर आणि जिल्हयात सतीश कुलकर्णी यांना ‘एस. के’ या टोपण नावाने ओळखले जात होते.
सतीश कुलकर्णी यांना त्यांनी केलेल्या कस्टम डिपार्टमेंटमधील सेवेसाठी राष्ट्रपती पदक देखील मिळाले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे सतीश कुलकर्णी यांची पुणे पोलिस आयुक्तातील अनेक अधिकारी व कर्मचार्यांशी अतिशय चांगली ओळख होती. एस. के यांना अलिकडेच कोरोना झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे आज (रविवार) उपचारादरम्यान दत्तवाडी परिसरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले आहे. महाविद्यालयीन काळात सतीश कुलकर्णी हे बॉक्सिंग चॅम्पियन होते.