मुंबई : बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना काही दिवसांपासून त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. मात्र त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी सध्या उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर धनंजय मुंडेंनी हे ट्वीट केले आहे.
धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ ट्वीटमध्ये दिला आहे. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचं समजलं. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, असे धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले.
ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या.
प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो. @DrPritamMunde— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 24, 2021
दरम्यान, खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. “गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हे लक्षणं जाणवायला लागले. २१ तारखेला मी RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला करोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत आहे”, असं प्रीतम मुंडे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.