बारामती – यंदाच्या गणेशोत्सवात रसिक बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. येथील बारामती गणेश फेस्टीव्हल, कसबा गणेश महोत्सव तसेच श्रीमंत आबा गणेश फेस्टीव्हलचे उद्घाटन मंगळवारी (दि. 3) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवाचा प्रारंभ निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाने होईल अशी माहिती फेस्टीव्हलप्रमुख किरण गुजर यांनी दिली. बुधवारी (दि. 4) श्रेया घोषाल यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम सादर होईल, गुरुवारी (दि. 5) मोहम्मद रफी यांच्या जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांचा “वन्समोअर रफीसाहेब’, शुक्रवारी (दि. 6) हिंदी मराठी गीतांचा गाणी “सोनेरी चंदेरी’, शनिवारी (दि. 7) लावणी सम्राज्ञी पूनम कुडाळकर यांचा “तुमच्यासाठी काय पण’ हा लावण्यांचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि. 8) विनोदी नाटक “दहा बाय दहा’ सादर होईल. सोमवारी (दि. 9) हिंदी चित्रपट गीतांचा “ताक धिना धिन’ कार्यक्रम होणार असून मंगळवारी (दि. 10) बारामतीचे स्थानिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. बुधवारी (दि. 11) अर्चना जावळेकर, संगीता लाखे, माया खुटेगावकर, प्राची मुंबईकर यांचा “अहो नादच खुळा’ हा कार्यक्रम सादर होईल. तीन हत्ती चौकातील नटराज नाट्य कला मंडळाच्या आवारात हा कार्यक्रम होईल.
काशीविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कसबा गणेश महोत्सवामध्येही कार्यक्रमांची रेलचेल आहे. मंगळवारी अर्चना सावंत यांचा लावणीचा कार्यक्रम, बुधवारी राधिका अत्रे यांचा “म्युझिकल धमाका ऑर्केस्ट्रा’, गुरुवारी हिच ती शुक्राची चांदणी कार्यक्रम, शुक्रवारी “म्युझिक ब्लास्टर ऑर्केस्ट्रा’, शनिवारी “कुर्यात सदा टिंगलम’ हे विनोदी नाटक, रविवारी चित्रकला स्पर्धा, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम, सोमवारी (दि. 9) सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार असून मंगळवारी (दि. 10) पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कसब्यात राष्ट्रवादी भवन शेजारी दररोज संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूरज सातव, सचिन सातव आदींनी दिली.
अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणेशोत्सवासाठीही मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी मंगेश बोरवणकर, अंजली गायकवाड व नंदीता गायकवाड यांचा “संगीत जल्लोष’, शनिवारी रुपाली भोसले यांच्या समवेत “होम मिनिस्टर’, रविवारी पौर्णिमा डे व ऋतुजा धर्माधिकारी यांचा “नृत्य जल्लोष’, सोमवारी “दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय रांगोळी स्पर्धा अथर्वशीर्ष पठण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व इतर कार्यक्रमांचेही आयोजन केल्याचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता प्रशासकीय इमारतीसमोरील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात होणार आहेत.