दुबई – फाफ डुप्लिसीसची तडाखेबाज फलंदाजी तसेच शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघावर 27 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद १९२ धावा केल्या. प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघाला २० षटकांत ९ बाद १६५ धावांपर्यंतच मजल मारता आली. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचे आयपीएलमधील हे चौथे जेतेपद ठरलं.
विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीला आलेल्या कोलतानाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी ९१ धावांची सलामी दिली. मात्र दोघेही अर्धशतकं करून बाद झाली. त्यानंतर मात्र कोलकाताचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. शार्दूल ठाकूरने तीन विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी कऱण्याचा निर्णय़ घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजानी दमदार फलंदाजी करत 192 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून फाफ डुप्लेसिसने 59 चेंडूत 86 धावांची खेळी केली, यामध्ये 7 चौकार आणि 3 षटकरांचा समावेश होता, तर मोईन अली याने 20 चेंडूमध्ये नाबाद 37 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 15 चेंडूमध्ये 31 धावा केल्या, तर ऋतुराज गायकवाड 27 चेंडूमध्ये 32 धावा करून बाद झाला.
गोलंदाजीमध्ये कोलकात्याकडून सुनिल नरेन याने 2 आणि शिवम मावीला 1 गडी बाद करण्यात यश आलं. सुनील नरेनने 4 षटकांत 26 तर शिवम मावीने 4 षटकांत 32 धावा दिल्या.