दुबई – सनरायझर्स हैदराबादच्या संघ मालक तसेच संघ व्यवस्थापनाने माझ्याकडून नेतृत्व काढून घेताना मला साधे कळवलेही नाही. कोणतीही चर्चा न करताच त्यांनी हा निर्णय घेतला, असा खुलासा हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हीड वॉर्नर याने केला आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु असतानाच वॉर्नरकडून नेतृत्व काढून घेतले गेले व न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे ही जबाबदारी सोपवली गेली. अर्थात या स्पर्धेत त्यालाही साफ अपयश आले व संघाला गुणतालिकेत तळातील स्थानावर समाधान मानावे लागले.
वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र, आता सांघिक कामगिरीसह वैयक्तिक कामगिरीही अपयशी झाल्यामुळे त्याच्याकडून केवळ नेतृत्वच काढून घेतले गेले नाही तर त्याला संघातूनही डच्चू देण्यात आला. याबाबतही वॉर्नरने नाराजी व्यक्त केली.