भोसरी (वार्ताहर) – शहरात करोनाचे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यात भोसरीचादेखील मोठा सहभाग आहे. भोसरीतील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भोसरीमधील महापलिकेचे प्राथमिक आरोग्य केद्रांत कोविड-19 ची तपासणीचे स्वॅब घेण्यात येत आहेत. त्यासाठी भोसरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. या गर्दीवर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारे नियंत्रण नव्हते. नागरिक इतरत्र फिरताना दिसून येत होते.
भोसरीत रुग्णांची संख्या वाढत आहेत. तर दुसरीकडे नागरिक नियमांचे पालन न करता गर्दी करत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शनिवारी सकाळी नागरिकांनी करोनाची चाचणी करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या गेट समोर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
करोनाची चाचणी करण्यासाठी आलेले नागरिक धूम्रपान करत होते. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून इतरत्र थुंकत होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कायद्याने गुन्हा असताना येथे मात्र कोणाचेच या गर्दीवर नियंत्रण नसल्याचे दिसून आले. नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने एखादी व्यक्ती करोना पॉझिटिव्ह नसली तरी येथे गर्दीत एकमेकांशी संपर्क येऊन करोनाबाधित होण्याची दाट शक्यता आहे.