शिक्रापूर -निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे एका करोना बाधित व्यक्तीचा शनिवारी (दि. 18) मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली.
निमगाव म्हाळुंगी येथील 58 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला काही त्रास सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यावेळी त्यांना करोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याला पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निमगाव म्हाळुंगी येथे प्रथमच करोनाचा शिरकाव झाला. ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी गावात पूर्णपणे फवारणी करत निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्या व्यक्तीच्या संपर्कातील 14 जणांची तपासणी करण्यात आली. त्या चौदा जणांपैकी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये एकाच घरातील अकरा जणांना करोनाची बाधा झाली आहे. यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे.