सिंहगडरस्ता (जयंत जाधव) -महापालिका निवडणूक लवकरच होईल, याबाबतचे सूतोवाच राज्य सरकारकडून आल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील “इच्छुक’ उमेदवार पुन्हा “सक्रिय’ झाले आहेत. आपल्या संभाव्य प्रभागामध्ये रेंगाळलेल्या विकासकामांचा पाठपुरावा, समाजिक उपक्रम सुरू झाले असून जनसंपर्क कार्यालयावर कार्यकर्ते, नागरिकांचीही गर्दी वाढू लागली आहे.
आपल्या प्रभागात आपण “इच्छुक’ असल्याचे दाखविण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, मतदार नोंदणी, प्रभागातील नागरिकांच्या समस्या याबाबचा पाठपुरावा, आयुक्तांना निवेदन दिल्याचे फोटो, पोस्ट, स्टेटस याचा भडीमार सोशल मीडियावर सुरू आहे. ज्या भावी उमेदवारांनी गेल्यास वर्षापासून तयारी सुरू केली होती ते गेल्या तीन-चार महिन्यांत थंडावले होते. परंतु, प्रभाग रचनेचे काम पालिकेने सुरू केल्याने असे उमेदवार आता चांगलेच “ऍक्टव्ह’ झाले आहेत.
राजकीय पक्षांनीही आजी-माजींसह “इच्छुक’ उमेदवारांना “तयारीला लागा’ असे आदेश दिले असल्याने सर्वांनीच पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. आपल्या पक्षातील मोठे नेते, आमदार, मंत्री यांच्या गाठीभेटी तसेच कार्यक्रमाला आमंत्रण देणे, त्यांच्यासमोर आपले काम दाखविणे तसेच “तिकीटा’साठी आपणच योग्य असल्याचे पक्षाध्यक्ष, वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याचा जोरदार प्रयत्न अनेकांनी सुरू केला आहे. येथील सर्वच प्रभागात उमेदवारीसाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.
वर्तमानपत्र विश्वासार्ह असल्याने…
महापालिकेने रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर बंदी आणल्याने उमेदवारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे वर्तमानपत्रात जाहिरात देणे, फेसबूक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर अशा मीडियाचा वापर केला जात आहे. डिजिटल मार्केटिंगसह वर्तमान पत्रात येणाऱ्या जाहिराती तसेच बातम्या अधिक विश्वासहार्य असल्याने त्यावर अनेकांचा भर आहे.