पुणे -शहरात तूरळक ठिकाणी शनिवारी सायंकाळी रिमझिम पाऊस पडला. शहरातील नागरिकांनी सकाळी गारठा, दुपारी ऊन आणि सायंकाळी पाऊस असा एकाच दिवसांत तीन ऋतूचा अनुभव घेतला. शहरात मागील दहा वर्षांतील विक्रमी किमान तापमानाची नोंद नोव्हेंबरमध्ये झाली होती. तापमानाचा पारा 10 अंशाखाली गेला होता. पण, मागील दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा किमान तापमानात कमालीची वाढ झाली असून पुढील काही दिवस परिस्थिती अशीच राहणार असल्याचा अदांज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या वर्षी मान्सून हंगाम लाबल्याने ऑक्टोबरच्या 20 तारखेपर्यंत शहरात पाऊस पडत होता. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवला नाही. पावसानंतर लगेच कडाक्याची थंडी पडली. 30 ऑक्टोबरला शहरात किमान तापमानात 12 अंशापर्यंत खाली गेले होते, त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. पण, नागरिक अजूनही गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत होते. पण, 20 नोव्हेंबरला शहरात किमान तापमानात 10 वर्षांतील विक्रमी घट नोंदवली होती.
किमान तापमान 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते. पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारतात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसेच, राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
दरम्यान, शनिवारी शहरातील कात्रज, सिंहगड रोड, कोथरूड, आंबेगाव, नऱ्हे या भागात पावसाची नोंद झाली आहे. शहरातील किमान तापमानात वाढ झाली असून शनिवारी 19.1 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.