मुख्यमंत्री साहेब तुमचा पीकविमा कंपनीत हिस्सा आहे का?

जालना – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री साहेब तुमचा पीकविमा कंपनीत हिस्सा आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. ते जालन्यातील वडीगोद्री येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, सरकारच्या सहकार्याशिवाय भ्रष्टाचाराचा जन्म होत नाही. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना देखील पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला तयार नाही.

अधिकारी पंचनाम्यांचे खोटे रिपोर्ट तयार करत आहेत.जर अशाप्रकारे प्रशासनाला हाताशी धरून असे खोटे रिपोर्ट तयार होणार असेल तर मी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मुख्यमंत्री साहेब तुमचा आणि कृषी मंत्र्यांचा पीकविमा कंपनीत हिस्सा आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

सरकारच्या आशीर्वादाशिवाय भ्रष्टाचाराचा जन्म होत नाही. ज्यावेळी एखादा दरोडा पडतो आणि त्यातून मुद्देमाल लंपास होतो. त्यावेळी दरोडेखोरांना मदत करणारा स्थानिकच असतो त्यामुळेच अशा प्रकारचा परफेक्ट दरोडा पडतो. असे जोरदार हल्ला करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पीकविमा कंपन्यांच्या गैरकारभारात हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.