फलटण -स्थावर मिळकतीची कायदेशीर मालकी नसताना ती आपली आहे असे भासवून तसेच मिळकत किमती असल्याचे भासवून तसा बनावट सर्च रिपोर्ट घेऊन, कर्ज रकमेसाठी गहाणखत करून स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिगंबर आगवणे स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद असून त्यांनी एक कोटी रुपयांची कर्ज मागणी करून त्याकरिता तारण म्हणून मौजे सुरवडी (ता. फलटण) हद्दीतील गट नंबर 48 /2 मधील एकूण क्षेत्र 4 हेक्टर 22 आर मधील हिस्सा 2 हेक्टर 46 आर यावर स्थावर मिळकतीची कायदेशीर मालकी नसताना ती आपली आहे असे भासवून फिर्यादीचे संस्थेचे फसवणूक करण्याच्या उद्देशाने तारण, गहाण म्हणून तसेच ती मिळकत किमती असल्याचे भासवून तसा बनावट सर्च रिपोर्ट घेऊन कर्ज रकमेसाठी गहाणखत करून फिर्यादीचे संस्थेची आर्थिक फसवणूक केली. तसेच कर्जवसुलीतून बगल देण्यासाठी माजी चेअरमन व संचालक मंडळांची प्रसारमाध्यमांतून खोटी व बदनामीकारक वक्तव्य केली आहे म्हणून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता.
त्यावरून न्यायालयाकडील या प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिल्याने या संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दत्तराज शिवाजीराव फडतरे (वय 42, शाखाधिकारी, स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण, रा.फडतरवाडी ता. फलटण) यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहे .