फलटण – कोळकी, ता. फलटण येथे जमीन खरेदी करून देतो, असे सांगून एकाची 26 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिखर शिंगणापूर येथील दाम्पत्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कोळकी येथील सर्व्हे नं. 57/4 मधील साडेचार गुंठे जमीन खरेदी करून देतो, असे सांगून बापू नामदेव शिंगाडे व त्याची पत्नी रूपाली (रा. शिखर शिंगणापूर, ता. माण) यांनी अभिजित जरिचंद सुरवसे (रा. नरसोबानगर, कोळकी, ता. फलटण) यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. 15 ऑगस्ट 2020 पासून आजअखेर वेगवेगळी कारणे सांगून शिंगाडे दाम्पत्याने सुरवसे यांच्याकडून 26 लाख 20 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात जमीन खरेदी करून देण्यास व पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याचे सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
जमिनीचा व्यवहार ठरल्यानंतरच्या कालावधीत साठेखत सुरवसे यांच्या नावे करण्याचे ठरले होते; परंतु शिंगाडेने एकूण नऊ गुंठे जागेचे साठेखत स्वत:च्या व पत्नीच्या नावे करून घेतले. सुरवसे यांनी 26 लाख 20 हजार रुपये परत मागितले असता, बापू शिंगाडेने पैसे परत देतो, असे म्हणून चालढकल केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सुरवसेंच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी शिंगाडे दाम्पत्याविरोधात फिर्यादी फलटणच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीवेळी बापू शिंगाडेने 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण पैसे परत देतो, असे लिहून दिले होते; परंतु ही तारीख उलटल्यानंतरही त्याने सुरवसे यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली, असे सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.