पिंपरी – पिंपळे निलख येथील माजी नगरसेवकाच्या सोसयटीमध्येच कमी दाबाने पाणी येत आहे. यामुळे अतिरिक्त पाण्यासाठी दररोज टॅंकर बोलावावा लागत आहे. पाणीपट्टी भरूनही आम्हाला पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची तक्रार पिंपळे निलख येथील नागरिकाने ड प्रभागातील जनसंवाद सभेमध्ये सोमवारी (दि. 11) केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयामध्ये सोमवारी जनसंवाद सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपआयुक्त अजय चारठणकर होते. या सभेमध्ये नागरिकांनी पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकाम, रस्ते आणि उद्यानासंदर्भात आपल्या तक्रारी मांडल्या. सभेमध्ये एकूण 12 तक्रारी मांडल्या. यावेळी पिंपळे निलख येथील ज्येष्ठ नागरिकाने माजी नगरसेवकाच्या सोसायटीमध्येच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर लक्ष वेधले. ते म्हणाले, गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
पाण्यासाठी वेळ कमी असून ते कमी दाबाने पुरवले जाते. त्यामुळे येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला. दुसऱ्या एका नागरिकाने आपल्या तक्रारीत म्हटले की, सोसायटीसाठी 6 इंची पाण्याची पाइपलाइन टाकली आहे. मात्र ती पुढे 4 इंचाची पालिकेने केली असून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. जेवढ्या पाण्याची मागणी आहे, तेवढे पाणी दररोज उपलब्ध होत नाही. त्यामुळे टॅंकरसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. टॅंकरचे पाणी आणि महापालिकेचे पाणी एकत्रित वापरल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. सोसायटीमधील नागरिकांना उलट्या व जुलाब अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनीही पिंपळे निलख येथील पाण्याची समस्या मांडली.
सूर्यकांत सरवदे यांनी प्रभाग क्रमांक 25 येथील नैसर्गिक नाला प्राधिकरणाने बुजवला असल्याची तक्रार केली. त्यावर महापालिका देखील कार्यवाही करत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर राजू काळे यांनी शहीद अशोक कामटे उद्यानामध्ये सुरक्षारक्षक नसल्याचा मुद्दा मांडला. त्याठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध असूनही नियोजन नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने पार्क करत असल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.