पिंपरी : पंक्‍चर व्यावसायिकावर धारदार शस्त्रांनी वार

पिंपरी – एका पंक्‍चर व्यावसायिकावर धारदार शस्त्रांनी वार करून कॉम्प्रेसर मशीन जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकारात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.22) मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास माऊली टी सेंटर शेजारील पंक्‍चरच्या दुकानात घडली. गणेश किशोर लोंढे (वय 20, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे जखमी पंक्‍चर व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू कांबळे (रा. मोहननगर, पिंपरी), विशाल कांबळे आणि बाळू या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे पंक्‍चरचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश हा त्याचे मित्र शंकर सुरवसे, विनोद विश्‍वकर्मा, गोट्या उर्फ पया कचरु ओव्हाळ यांच्यासोबत बसला होता. इतक्‍या तिघे आरोपी तेथे आले आणि गोट्या याच्या भावाने राजू याचे रिक्षाच्या शिफ्टचे पैसे न दिल्याचा जाब विचारला. तसेच गणेश यांच्या पंक्‍चरच्या दुकानातील 15 हजारांचे कॉम्प्रेसर मशीन जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गणेश याने त्यांचा विरोध केला असता आरोपींनी गणेशवर धारदार शस्त्रांनी वार करुन गंभीर जखमी केले व मशीन जबरदस्तीने चोरुन नेली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बांबळे करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×