पुणे – पुणे डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित डॉक्टर्स प्रिमिअर लीग राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर किलर्स, मुंबईच्या एमपीए इत्तेहाद मुंब्रा आणि पुण्याच्या पीडीए शिवाजीयन्स् या संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला. या स्पर्धेत डॉ. दिपक बावचे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूरच्या कोल्हापूर किलर्स संघाने सुपर स्ट्रायकर्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला.
सुपर स्ट्रायकर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना डॉ. वैभव पाटील याच्या नाबाद 55 धावांच्या जोरावर 103 धावांचे आव्हान उभे केले. कोल्हापूर किलर्स संघाने हे आव्हान 14.2 षटकांत व 4 गडी गमावून पूर्ण करत विजयी सलामी दिली. पीडीए शिवाजीयन्स् संघाने कन्स्लटंट इलेव्हन संघाचा 39 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पीडीए शिवाजीयन्स् संघाने 15 षटकामध्ये 3 गडी गमावून 159 धावा जमविल्या.
या आव्हानाला उत्तर देताना कन्स्लटंट इलेव्हन संघाचा डाव 120 धावांवर मर्यादित राहिला. एमपीए इत्तेहाद मुंब्रा संघाने स्पार्टन्स् युनायटेड संघाचा 10 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचा रणजीपटू खेळाडू धीरज जाधव, पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, उपाध्यक्ष डॉ. सचिन केदार आणि पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे क्रीडा अध्यक्ष डॉ. विजय काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. रवींद्र काटकर, खजिनदार डॉ. मेघना करांडे, डॉ. अंबिका गरड, रमेश मोहिते, डॉ. संतोष कवितके, अनिल लिंगडे, डॉ. सुनील जगताप, डॉ. निलेश जगताप, डॉ. स्वप्नाली वाडेकर आणि डॉ. सचिन लकडे आदी उपस्थित होते.