पुणे – एस. एम. जोशी स्मृती फुटबॉल स्पर्धेत वरिष्ठ गटात इंद्रायणी क्लबने, ज्युनिअर गटात सनी डेज क्लबने तर, महिला गटात एसकेएफ संघाने विजेतेपद मिळविले.वरिष्ठ गटाच्या अंतिम सामन्यात इंद्रायणी क्लबने डेक्कन इलेव्हन अ संघाचा 2-0 असा पराभव केला. इंद्रायणी क्लबच्या शुभम गायकवाडने 22व्या मिनिटाला तर, जगत राज याने 58 व्या मिनिटाला गोल केले व संघाला विजेतेपद मिळवून दिले.
ज्युनिअर गटाच्या अंतिम सामन्यात सनी डेज क्लबने गॅलटिक वॉरियर्स क्लबचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला व विजेतेपदाचा मान मिळविला. निर्धारित वेळेत या सामन्यात गोलशून्य बरोबरी झाल्याने टायब्रेकरमध्ये हा सामना निकाली काढण्यात आला. त्यात सनी डेजने वर्चस्व राखले. महिला गटाच्या अंतिम लढतीत एसकेएफने स्पोर्टस एक्सेल क्लबवर 4-1 असा विजय मिळविला. राहिन शेखने 7 व्या व 13 व्या, सानिया शेखने 9व्या तर, रोशनी पंडितने 23 व्या मिनिटाला गोल केले. स्पोर्टस एक्सेलच्या एच. साक्षीने 27 व्या मिनिटात गोल केला मात्र नंतर त्यांना एसकेएफचा बचाव भेदता आला नाही व पराभवाचा सामना करावा लागला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पिंपरी चिंचवडचे नगरसेवक समीर मासुळकर, अल्ताभ शेख, रशीदा खान, पुणे जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया, संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.