नवी दिल्ली – चीनमुळे जगभरात हाहाकार उडालेल्या करोना विषाणूंचा प्रसार होत असताना आता क्रीडा क्षेत्रात या विषाणूंचा पहिला बळी गेला आहे. चीनपाठोपाठ युरोपातही या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. त्यातच सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या स्पेनमध्ये एक 21 वर्षांच्या फुटबॉल प्रशिक्षकाचा मंगळवारी मृत्यू झाला.
ऍटलिको पोर्टडा क्लबचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला करोनाची लागण झाली होती व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. फ्रान्सिस्को गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देत होता, त्याची प्रकृती सुधारत देखील होती, त्यातच त्याला करोनाची लागण झाली व अखेर त्याचा लढा अपयशी ठरला.
चीनसह आज जवळपास दीडशे देशांत या करोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. याचा धोका असल्यामुळे जागतिक पातळीवरीलच नव्हे तर देशांतर्गत अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून काही स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल करुन त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही स्पर्धांना तर प्रेक्षकांना, प्रशिक्षकांना तसेच खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही प्रवेश नाकारला जात आहे.