ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले. आता या फेरीत त्यांची लढत इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडची फिरकी गोलंदाजीवर उडणारी त्रेधा पाहता रवीचंद्रन अश्विन पुरेसा नाही, यजुवेंद्र चहललाही खेळवले गेले पाहिजे.
जसे ऑस्ट्रेलियाचा संघ ऑफ स्पिन गोलंदाजीवर नाच करायचा तीच गत इंग्लंडची लेग स्पिनवर होताना दिसतो. त्यातही चहलची गोलंदाजीची शैली व त्याच्या भात्यातील अस्त्रे पाहता इंग्लंडच्या फलंदाजांचा कस लागेल. इंग्लंडकडे बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम कुरेन हे फलंदाज वगळले तर बाकी फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारे आहेत. ते चहलची गोलंदाजी त्यांना जड जाऊ शकते.
चहलकडे रॉंग वन, फ्लिपर, स्ट्रेटर वन, गुगली, रीपर, मुळ लेग स्पिन असे विविध चेंडू आहेत. तसेच तो थोडा राऊंड आर्म शैलीने गोलंदाजी करत असल्याने त्याला खेळपट्टीचाही वापर जास्त चांगला करता येतो. 20 षटकांच्या सामन्यात त्याच्या चार षटकांत 20 धावांत 3 गडी जरी बाद केले तेदेखील पहिल्या पाचमधले तर भारताची अर्धी लढाई यशस्वी ठरेल.
या संपूर्ण स्पर्धेत संघ व्यवस्थापनाने चहलला खेळवलेले नाही, त्यामुळे तो सरप्राइज पॅकेज ठरेल यात शंका नाही. अलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक्स, जोस बटलर, ख्रिस वोक्स यांना लेग स्पिन खेळणे सातत्याने आव्हानात्मक ठरले असल्यामुळे चहलचा वापर जर कर्णधार रोहित शर्माने खुबीने करून घेतला तर इंग्लंडची वाताहत करणे कठीण जाणार नाही.
त्यांच्या जोस बटलर व सॅम कुरेनला लवकर बाद केले तर त्यांच्या आव्हानातील हवाच निघून जाईल यात शंका नाही. मात्र, याचबरोबर भारतीय संघाने धावफलकावर किमान 180 ते 200 धावा लावणे गरजेचे आहे. त्यासाठी सूर्यकुमार यादव व विराट कोहलीवरच भिस्त ठेवून चालणार नाही तर सगळ्यांनीच जबाबदारीने खेळणे महत्त्वाचे आहे.