-अमित डोंगरे
यजुवेंद्र चहल याला सर्वप्रथम पाहिला तेव्हा हा कृश मुलगा क्रिकेटपटू म्हणून किती यशस्वी होईल अशी शंका आली. मात्र, त्याने त्याच्या गुणवत्तेने आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. चहल एक क्रिकेटपटू म्हणून सरस आहेच, लेगस्पीनर म्हणूनही हुशार आहे. पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून तो सालसही आहे व वल्लीही.
लहान असल्यापासून क्रिकेटपेक्षा बुद्धिबळात जास्त रस असलेला चहल 64 घरांचा राजा झाला असता मात्र, त्याला उन्हातान्हात खेळपट्टीवर राज्य करायचे होते. त्यामुळे आपल्या आवडीला मुरड घालत क्रिकेटची आवड जोपासत त्याने आज एक यशस्वी आंतरराष्ट्रीय लेग स्पीन गोलंदाज अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आज वयाची तिशी गाठल्यावरही त्याचा जोम, उत्साह कमी झालेला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वात स्प्लीट पर्सनॅलिटी देखील अनेकदा जाणवते. त्याच्या लहानपणी कदाचीत त्याला शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनाचा आनंद फार लुटता आला नसावा. कारण बुद्धिबळ व क्रिकेट यांची सांगड घालता घालता त्याला कॉलेजच्या कंपूसह टाइमपास करता आला नाही हे त्यानेच एकदा सांगितले होते. पण त्याच्या खोडकर स्वभावामुळे जागतिक क्रिकेटमधील एक व्यक्ती नव्हे तर वल्ली अशी त्याची सार्वभौम ओळख निर्माण झाली आहे.
2016 साली झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय व टी-20 सामन्यांत पदार्पण केलेल्या चहलने आजवर 52 एकदिवसीय सामन्यांतून 91 बळी घेतले आहेत. तर, 42 टी-20 सामन्यांतून 55 बळींची नोंद केली आहे. त्याला अद्याप कसोटी संघाची कवाडे खुली झालेली नसली तरी तो दिवस फार लांब नाही. हरियाणात जन्मलेला चहल आज जागतिक क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करून राज्य करत आहे.
क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी चहलने युवा गटाच्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपद स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. इतकेच नव्हे तर त्याला जागतिक बुद्धिबळ महासंघाने रेटिंग लीस्टमध्येही स्थान दिले होते.
मार्चपासून जगभरात करोनाचा धोका निर्माण झाला तेव्हापासून क्रिकेट ठप्प झाले होते. या काळात करायचे काय असा प्रस्न सर्वसामान्यांप्रमाणे क्रिकेटपटूंनाही पडलेला होता. चहल मात्र, बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळासाठी खेळाडूंच्या मुलाखती घेण्यात दंग होता. तसेच काही खेळाडूंशी थट्टा-मस्करी करण्यातही त्याने हाइट केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर यांच्याशी असलेली त्याची मैत्री सर्वश्रुत आहेच त्यामुळे त्यांना पिडण्यातच त्याचे अनेक दिवस व्यतीत होत होते.
क्रिकेटच्या सामन्यात देखील त्याचा खुशमस्करी स्वभाव लपून राहात नाही. एखाद्या बाका प्रसंगात समोरच्या फलंदाजाने षटकार किंवा चौकार जरी फटकावला तरी दात बाहेर काढून विकट हास्य करण्याची त्याची सवय काहीवेळा विनोद वाटते तर काही वेळा संतापजनक पण तो त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसारच खेळतो. तो गंभीरतेचा मुखवटाही घालत नाही.
प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक धनश्री वर्मा हिच्याशी त्याचा साखरपुडा झाला असून लवकरच हे दोघे विवाहबंधनातही अडकणार आहे. त्याने अन्य खेळाडूंसारखे या नात्याला लपवले नाही तर उघडपणे त्याची कबुलीही दिली. त्याच्या साखरपुड्यानंतर तरी हा मुलगा सुधारेल व आपल्याच सहकारी खेळाडूंची थट्टा करणे थांबवेल हा समजही त्याने खोटा ठरवला. करोनामुळे सध्या अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतही चहलच्या लिला सुरूच आहेत.
खरे सांगायचे तर काहीवेळा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांनाही त्याच्या या वल्ली व्यक्तिमत्त्वाचा त्रासही झाला असेल मात्र, त्याच्या खट्याळ स्वभावामुळे ड्रेसिंगरुममधील वातावरणातील ताण कमी होतो व हसते खेळते वातावरण तयार होते जे भारतीय संघाच्या मैदानावरील वर्चस्वाची साक्षही देते. 64 घरांवर वर्चस्व राखलेला हा बुद्धिबळपटू आजचा सर्वोत्तम लेगस्पीनर म्हणून ओळखला जातो. तसाच एक मर्मविनोदी किंवा अनेक खेळाडूंना चिमटे काढणारा वल्ली म्हणूनही नावाजला जातो.