पुणे – कमी उत्पन्नाअभावी तोट्यात असणारे पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) आर्थिक चाके अधिकच रुतत आहे. यामुळे प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी विविध मार्गांची चाचपणी सुरू केली आहे. यांतर्गत प्रामुख्याने बस, बसथांबे आणि मिळकतींवर लक्ष देण्यात येणार आहे.
लॉकडाऊन काळात बंद असणारी पीएमपीची सेवा सप्टेंबरपासून 25 टक्के क्षमतेने सुरू झाली. मात्र, प्रवासी संख्या कमी असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. यासंदर्भात संचालक मंडळांशीही चर्चा करण्यात येत आहे.
महामंडळाकडे बस, बीआरटी शेल्टर्स, बसथांबे ही जाहिरातीची माध्यमे आहेत.
यातूने 2019-20 मध्ये सुमारे 9.34 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यांतर्गत येत्या काळात होर्डिंग्ज उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देणे, बीआरटी बस शेल्टर्सच्या बाहेरील भागात ग्लोसाईन बोर्डद्वारे, बीआरटी कॉरिडोरवर, महामंडळाकडील इमारतींवर नव्याने डिजिटल जाहीरात बोर्ड उभारणे, डेपो आणि बसस्थानकांवर क्युऑस्क फलक बसवणे, नव्याने बस शेल्टर्स उभारून बीओटी तत्वावर ठेका देणे आदींबाबत चर्चा करण्यात येणार आहे. याद्वारे सुमारे 7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे प्रशासनाला अपेक्षित आहे.
थांब्यांना लिलाव पद्धतीने नाव देणार
पीएमपीचे संचलन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये होते. या मार्गांवर 1 हजार बसशेल्टर्स असून, 500 बसशेल्टर्स नियोजित आहेत. यापैकी अनेक बसथांबा आजुबाजुच्या प्रसिद्ध बॅंका, दुकाने आदींच्या नावाने ओळखले जाते. याद्वारे महामंडळ बस शेल्टर्सच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आगामी काळात संबंधित मार्गावरील बॅंका, दुकाने, मॉल आदीचे नाव देण्यासाठी संबंधित नाव लिलाव पद्धतीने विकण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.