महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अवघ्या आठ दिवसांत उभारली यंत्रणा
पुणे – करोनाविरुद्धच्या लढ्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्तांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत “क्रेडाई’ने आठ दिवसांत अतिदक्षता विभाग महापालिकेच्या दळवी रुग्णालयात उभारला आहे. यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी क्रेडाई पुणे मेट्रोने उपलब्ध करून दिला.
महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या उपस्थितीत या अतिदक्षता विभागाचे हस्तांतरण करण्यात आले. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी तेजराज पाटील आणि आय. पी. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. “या अतिदक्षता विभागात खाटा, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अशा 40 अद्ययावत उपकरणांचा समावेश आहे. 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी क्रेडाई पुणे मेट्रोला यासंदर्भात आवाहन केले.
त्या वेळी आम्ही पुढील 15 दिवसात महापालिकेच्या रुग्णालयामध्ये अद्ययावत अतिदक्षता कक्ष उभारू असे आश्वासन दिले. मात्र आमच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत विक्रमी आठ दिवसांच्या कालावधीत रुग्णांच्या सेवेसाठी हे आयसीयु युनिट तयार केले याचा आम्हाला आनंद आहे,’ असे मर्चंट यांनी सांगितले.
“शिवाजीनगर भागातील दळवी रुग्णालय हे प्रसूतीसाठीचे या भागातील एकमेव रुग्णालय होते. या ठिकाणी आता या संकटाच्या काळात अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने या भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विक्रमी वेळेत तयार झालेला हा अतिदक्षता विभाग महापालिकेच्या इतिहासात नोंद करण्यासारखा टप्पा झाला आहे. गरीब रुग्णांसाठी आता खऱ्या अर्थाने हे महापालिकेचे रुग्णालय आश्रयस्थान राहील,’ असे गायकवाड म्हणाले.
करोनाशी लढा देत असताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मदतीचा हात देत आहे. क्रेडाई पुणे मेट्रोनेदेखील या संकटाच्या काळात आमच्या बरोबर सहभागी होत महापालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने सामाजिक दायित्व दाखवत मदतीचा हात पुढे केला आहे, ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. या अतिदक्षता विभागामुळे गरीब रुग्णांना एक दिलासा मिळणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर