सोमेश्वरनगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. बाजारपेठेत खेळते भांडवल बंद झाले असून आधीच आर्थिक मंदी असताना आता ही मंदी आणखी उग्र रूप धारण करणार आहे, त्यामुळे अनेकांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलावर उभी आहे. अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली असून मार्च महिन्याचेही वेतन दिलेले नसल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे जगावे तरी कसे असे म्हणण्याची वेळ बारामती तालुक्यातील सर्वसामन्य नागरिकांवर आली आहे.
बारामती तालुक्यातील सर्वच बाजारपेठांसह गावागावांत शुकशुकाट असल्याने त्याचा थेट परिणाम दैनंदिन व्यवहारावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा देणारी म्हणाजेच किराणा, दूध डेअरी आदी दुकाने सुरू असून या दुकानांवर आर्थिक गाडा चालणारा नाही. तर बॅंका जरी सुरू असल्याने बाहेर पडताना करोनाचे सावट असल्याने नागरिक बाहेर न निघता ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देत असल्याने जे थोडेफार भांडवल पूर्वी बाजारात खेळत होते त्याच्या 10 टक्केपण भांडवल आता बाजार खेळत नसल्याने आर्थिक चाक थांबल्यातच जमा आहे.
बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने पतसंस्था तसेच मल्टिस्टेट बॅंकांच्या पिग्मी एजंटचे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. सोमेश्वर परिसरात विविध पतसंस्थाचे जवळपास 40 पिग्मी एजंट म्हणून कमिशनवर काम करतात; मात्र बाजारपेठेत ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे खेळते पैसे बंद झाले आहे. काही व्यापाऱ्यांची दुपारपर्यंत बोहणीच होत नसल्यामुळे पिग्मी भरणे बंद केले आहे.
– संदीप तांबे,
पिग्मी एजंट, सोमेश्वरनगर
सध्या करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ग्राहक वस्तू खरेदी करण टाळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या सध्या कमी झालेली आहे. आणि सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम एकच आठवडा राहिला असून ऊसतोड मजुरांची या वर्षीचा आलेले सण केले नसल्याने कारखाना दुकानदारीवर माल न गेल्याने आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे
– संतोष गाढवे, किराणा व्यापरी, सोमेश्वरनगर