fbpx

पुणे : वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करा

लोणीकंद पोलीस स्टेशनचा पुणे शहर पोलीस दलात समावेश केल्याने ग्रामस्थांच्या संमिश्र प्रतिक्रिया

वाघोली (प्रतिनिधी) – गृह विभागाने पुणे शहर आयुक्तालयाच्या पुर्नरचनेमध्ये लोणीकंद पोलीस स्टेशनचा समावेश पुणे शहर पोलीस दलात केल्याचे अधिसूचनेत नमूद केल्यानंतर वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

हौसिंग सोसायटी व इतर नागरिकांनी पुणे शहर हद्दीच्या समावेशाचे भरभरून स्वागत केले आहे, तर स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी शहर हद्दीच्या समावेशाला विरोध दर्शविला आहे. पुणे ग्रामीण किंवा शहर पोलीस दलात असले तरी वाघोली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे, या मागणीसाठी वाघोलीकर आग्रही असल्याचे दिसत आहे. 

पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या लोणीकंद आणि लोणी काळभोर या दोन पोलीस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पुर्नरचनेत समावेश करण्यात आल्याने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली आणि इतर गावांमध्ये या निर्णयाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

“लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्याबाबत विरोध असणारच आहे. भविष्याचा विचार करता वाघोली आणि उरुळीकांचन स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही नागरिक पुणे शहर पोलीस दलाच्या समावेशाला समर्थन देत आहेत; परंतु सर्वसामान्य व्यक्तीला आयुक्तालयात कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता आहे. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा झाली असून शहर पोलीस दलात समावेशाला विरोध असेलच.
– अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली

सोशल मीडियामध्ये हौसिंग सोसायटी आणि इतर नागरिकांनी या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून पारदर्शकता, अचूकता, कार्यतत्परता, वाहतूक कोंडी सोडविताना जलदपणा येईल असा आशावाद व्यक्त केला आहे.

“वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी शासन दरबारी गेल्या 20 वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. वाघोली येथील केसनंद फाटा येथील जागेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. तसा ठराव देखील केला होता. आता पुणे शहरास पोलीस ठाणे जोडले तर नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहोत.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली.

स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य माणसाला ग्रामीणमध्ये मिळणारा प्रतिसाद शहर पोलीस आयुक्तालयात मिळणार नाही आणि इतर मुद्द्यांसह युक्तिवाद करून विरोध दर्शविला आहे. शहर पोलीस दलात दोन्ही पोलीस स्टेशन समाविष्ट होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी वाघोलीतील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.