सासरी जाताना रडण्यासाठी क्रॅश कोर्स

भोपाळ – विवाहानंतर वधू श्‍वशूरगृही जाण्यासाठी निघताना तिच्यासह माहेरच्या सर्वांनाच रडू कोसळते. काही वेळा या रडण्याचा अतिरेकही होतो. असे होऊ नये यासाठी यावेळी भान ठेवून कसे रडायचे यासाठी येथील एका महिलेने सात दिवसांचा क्रॅश कोर्स तयार केला आहे. हा कोर्स भोपाळमधील राधिका राणी यांनी सुरू केला असून त्यांनी ही माहिती दिली आहे.

एखाद्या व्यक्‍तीच्या घरी त्याच्या मुलीचा किंवा बहिणीचा विवाह असेल तर ती सासरी निघाल्यावर सगळ्यांच्याच भावनांचा बांध फुटतो. सुरुवातीला मुसूमुसल्यानंतर अचानक ओक्‍साबोक्‍शी रडू येते. यावेळी मालिका किंवा चित्रपटाप्रमाणे पार्श्‍वसंगितही वाजू लागते. मात्र, मंगलमय सनईच्या सुरांवटींना कारुण्याची झालर येते व वधू सासरी निघाली आहे का कोणा व्यक्‍तीचे निधन झाले आहे, असा प्रश्‍न निर्माण होतो. ही ओव्हरॅक्‍टिंग टाळण्यासाठी येथिल एका पथनाट्य कलाकार असलेल्या राधिका रानी यांनी हा सात दिवसांचा क्रॅश कोर्स सुरु केला आहे. सुरूवातीला त्यांच्या या अभिनव कल्पनेची थट्टा केली गेली, टरही उडवली गेली.

मात्र, काही दिवसांतच त्यांच्या या अभ्यासक्रमाची इतकी प्रसिद्धी झाली की आता त्यांच्याकडे हा कोर्स करण्यासाठी विवाह ठरलेल्या भावी वधूंची व तीच्या कुटुंबीयांची रिघ लागली. आपल्या आई-वडिलांचे घर म्हणजे आपले माहेर सोडून मुलगी आपल्या सासरी जाण्यासाठी निघाल्यावर सर्वांच्याच भावना अनावर होतात व काही प्रसंगी इतकी रडारड होते की त्रयस्थ व्यक्तींबरोबरच सासरच्या नातेवाइकांनाही रडू फुटण्याएवजी हसू येते. आजकालच्या काळात तसे पाहायला गेले तर शहरी भागात हे प्रमाण कमी दिसते.

मात्र, आपली मुलगी दूरगावी दिली असेल तर मात्र, या रडारडीला चांगलाच जोर चढतो. असे होऊ नये यासाठी अत्यंत योग्य पद्धतीने मार्गदर्शन राधिका देतात. तसेच त्यांच्याकडे डेटा बॅंक स्वरुपात असलेल्या काही विवाहांच्या व्हिडीओ डिव्हीडी देखील दाखवल्या जातात. यातूनच काय टाळायचे व त्या क्षणी मनावर व भावनांवर कसा ताबा ठेवायचा याचेही मार्ग सुचवले जातात. आता या क्रॅश कोर्सची चर्चा केवळ राज्यातच होत नसून अनेक राज्यांतही त्यासाठी ऑनलाइन चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या या क्रॅश कोर्सची चर्चा आता सोशल मीडियावरही चांगलीच रंगत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.