सणबूर (वार्ताहर) – पाटण तालुक्यात करोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड तसेच सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे पाटण तालुक्यात ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात 35 बेडचे ऑक्सीजनसह कोविड रुग्णालय सुरु करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये मोठया प्रमाणात करोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. करोना रुग्णांचा तालुक्याने 500च्या वर टप्पा ओलंडला आहे. एकूण 576 करोनाबाधित रुग्ण आढळले त्यापैकी 367 रुग्ण बरे झाले आणि 179 रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या 30 रुग्ण मयत झाले आहेत.
कराड व सातारा या ठिकाणीही रुग्ण संख्या जास्त असल्याने पाटण तालुक्यातील रुग्णांना कराड व सातारा येथे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु करण्यास सुविधा आहेत. त्याठिकाणी ऑक्सीजनसह 35 बेडचे कोविड रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा सुरू आहे.
या रुग्णालयाकरीता एमबीबीएस वैद्यकीय अधिकारीही उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. पाटण तालुका प्रशासनाने कोविड रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे, त्या उपाययोजना तात्काळ पूर्ण करुन घ्याव्यात. जेणेकरुन लवकर हे कोविड रुग्णालय सुरु होईल, याकडे लक्ष द्यावे.