सातारा – साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष आणि राजघराण्यातील बाराव्या पिढीचे सदस्य ज्येष्ठ समाजकारणी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय 75) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पुणे येथे निधन झाले. पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी रात्री उशिरा शिवाजीराजे यांचे पार्थिव अदालतवाडा येथे आणण्यात येणार असून उद्या बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवाजीराजे यांच्यावर पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या वृषालीराजे भोसले आहेत.शिवाजीराजे भोसले 1985 ते 1991 या काळात सातारा नगरीचे नगराध्यक्ष होते.
मनमिळावू स्वभाव आणि विकास कामाचा आग्रह यामुळे त्यांच्या कामाची सातारा शहरात चांगली छाप होती. शिवाजीराजे भोसले यांचा जन्म 23 एप्रिल 1947 रोजी झाला. सातारा शहरातील अनेक सामाजिक व क्रीडा संघटनांशी ते संबंधित होते. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते उपाध्यक्ष होते. आरे गावच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून सक्रिय होते. करंजे सेवा धाम अग्नि मंदिर प्रतिष्ठानचे शिवाजीराजे कार्याध्यक्ष होते.
शिवाजीराजे यांचे अदालत वाडा हे निवासस्थान कायमच राजकीय केंद्रबिंदू राहिले. सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतापसिंहराजे भोसले, माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले व विजयसिंहराजे भोसले यांचे ते बंधू होते. तर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते चुलते होते. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे मनोमिलन घडवण्यात शिवाजीराजे यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांतील विविध कार्यक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असायचा. क्रीडा क्षेत्रातील विविध संघटनांचे ते पदाधिकारी होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात त्यांचा पुढाकार असायचा.
आमचे सख्खे चुलते, आमच्या वडीलांनंतर, आम्हास वडील असलेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळे व्यक्तीश: आमची व राजघराण्याची अतोनात हानी झाली आहे. एक संयमी नेतृत्व हरपले आहे. सलग साडेसहा वर्ष साताराचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या आमच्या काकांचा अनेकांना असलेला भरभक्कम आधार निखळला गेला. आमच्या भगिनी चि.वृषालीराजे यांचे पितृछत्र काळाने हिरावून घेतले असले तरी त्यांच्या पुढील कौटुंबिक, सामाजिक कार्यात, दुखा:वेगाला आवर घालून बंधू म्हणून आलेली जबाबदारी आम्ही निश्चितच पार पाडू.
खासदार उदयनराजे भोसले
शिवाजीराजे भोसले आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ आणि आदर्श व्यक्ती होते. त्यांनी नगराध्यक्ष म्हणूनही चांगले काम करून एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून मी एका चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो आहे. त्यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या कार्यामुळे ते कायम आपल्यात राहतील. आई भवानी त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवाजी महाराजांच्या निधनामुळे सातारच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि जनसामान्यांबद्दल अत्यंत जिव्हाळा असणारा होता. साताऱ्यातील कुठल्याही माणसाला केव्हाही त्यांच्याकडे गेल्यानंतर शक्य ती मदत ते करत असा त्यांचा परिपाठ होता. माझी आणि त्यांची वैयक्तीक मैत्री गेल्या 40 वर्षांची होती. राजकीय जीवनातही सातारचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले.
अरूण गोडबोले