सातारा -गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रतिलिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करत भाजप व महायुतीच्या वतीने सोमवारी सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी थोरवे आणि तहसीलदार सौ. आशा होळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बॅंकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणे, युरियाचा तुटवडा, अतिवृष्टीमुळे झालेले पिकाचे नुकसान अशा विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. या संकटातच दुधाचे भावही कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
राज्यात एक कोटी 40 लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी 35 लाख लिटर सहकारी संघाकडून, 90 लाख लिटर दूध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून तर 15 लाख लिटर दूध शेतकरी हॉटेल्स व ग्राहकांना पुरवतो.
शासकीय योजनेद्वारे फक्त एक लाख लिटर दुध खरेदी केले जाते. लॉकडाऊनच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली. आज खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध 15 ते 16 रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही.
शासनाने दहा लाख लिटर दूध 25 रुपये प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात सात लाख लिटर दुध खरेदी केले जात आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर 10 रुपये अनुदान, दुध भुकटीकरिता प्रती किलो 50 रुपये अनुदान, शासनाकडून 30 रुपये प्रती लिटरने दुधाची खरेदी या मागण्यांकरिता सर्व शेतकरी एक ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हणले आहे.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना पाठवण्यात आली आहे. यावेळी भाजप प्रदेश कार्यकरिणी सदस्य अमित कुलकर्णी, शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, विट्ठल बलशेटवार, ग्रामीणचे सरचिटणीस गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे व नगरसेवक विजय काटवटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, ग्रामीण उपाध्यक्ष तेजस काकडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.