पोलीस निरीक्षक जखमी : वाहतूक नसल्याने मोठा अपघात टळला
जुन्नर (वार्ताहर) – कल्याण-नगर मार्गावरील माळशेज घाटातील बोगद्याजवळ सोमवारी (दि. 20) सकाळी दरड कोसळली. दरम्यान, जिल्हा बंदीमुळे रस्त्यावर वाहतूक नसल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. तर सोमवारी एका कारवर दरड कोसळल्याने कारमधील परळीचे पोलीस अधिकारी अशोक देसले जखमी झाले आहेत.
माळशेज घाटात याआधी दोन ठिकाणी दरड कोसळली होती. पण त्यावेळी वाहन किवा जीवितहानी झाली नव्हती. मात्र, या दुर्घटनेत या स्विफ्टसह इतर काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी टोकावडे पोलीस व महामार्ग पोलीस हजर झाले होते.
दरम्यान, रस्त्यावर कोसळलेली दरड, माती व दगड यंत्रांद्वारे काढण्यात आली असून आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. या परिसरात धुके असल्याने वाहनचालकांनी घाटात न थांबता तसेच वाहनाचे दिवे लावून प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.