जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पानसरे : निसर्ग चक्रीवादळाने झाले आहे नुकसान
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती दुरुस्तीसाठी 16 कोटी 51 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यात खेड तालुक्यासाठी 1 कोटी 94 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या इमारतीच्या दुरुस्तीचे कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
तालुक्यातील 29 गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शाळा अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली होती. तर पानसरे यांनी नुकसानग्रस्त शाळा अंगणवाड्या आरोग्य केंद्र आणि नागरिकांच्या घरांचे जनावरांच्या गोठ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता.
खेड तालुक्यातील शाळा व अंगणवाड्या व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी शिफारस केल्याप्रमाणे 29 शाळांसाठी 1 कोटी 8 लाख 72 हजार रुपये, 41 अंगणवाड्यासाठी 57 लाख 38 हजार तर 10 आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्तीसाठी 28 लाख 75 हजार रुपयांची नुकसान भरपाई रक्कमेला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.