वेल्हे -वेल्हे तालुक्यात दोन महिन्यांपासून करोनाने धुमाकूळ घातला असून बाधितांच्या संपर्कातील संशयितांच्या स्वॅबची तपासणी करण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी वेल्हे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोविड सेंटरची उभारणी केली असून नमुना घेण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
वेल्हे तालुक्यात करोना संसर्ग सुरूच आहे. जुने रूग्ण बरे होऊन घरी परतत असले तरी दिवसेंदिवस नव्या रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संशयितांना तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात घेऊन जावे लागत होते. रुग्णवाहिका लवकर मिळत नव्हती. पर्यायाने करोनाची साखळी रोखण्यासाठी विलंब होत होता. यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागत होती.
त्यामुळे प्रशासन व संशयित रुग्णांचे हाल होत होते. हा सर्व त्रास थांबावा या उद्देशाने तहसीलदार शिंदे यांनी वेल्हे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कोविड सेंटरची उभारणी केली. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्याने हे केंद्र खुले केले आहे. या सेंटरमध्ये मंगळवारपासून करोना रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आले आहे.
सध्या तालुक्यात साखर येथील 68 वर्षीय महिला व निगडे मोसे येथील 19 वर्षीय महिला अशा दोन महिलांना लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निगडे मोसे येथील बाधित महिलेच्या संपर्कातील 11 जणांचे स्वॅब घेतले होते. यातील सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आसनी दामगुडा येथील एका संशयित व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला असून तूर्तास तरी करोनाची साखळी तुटला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.