नगर -शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्यासाठी व नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यासाठी गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात आजपासून गुरू आनंद कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा आमदार अरुण जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक गणेश भोसले, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, डॉ. विजय भंडारी, प्राचार्या डॉ. अंजली देशमुख, रोशन चोरडिया, डॉ. आशिष भंडारी, विपूल शेटिया, विशाल शेटिया आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, करोनाकाळात आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत पोचविली नगरमधील पोलीस दलानेही सेवाभावी वृत्तीने काम करत नगरची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय व गुरू आनंद फाउंडेशनेने हे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरला जितो अहमदनगर, सकल राजस्थानी युवा मंच, बडीसाजन युवक संघ, जय महावीर युवक मंडळ,
महावीर प्रतिष्ठान या सात संस्थांचे सहकार्य मिळत आहे.
या सेंटरमध्ये सकाळी रुग्णांना योग शिकविले जाणार आहेत. गुणे आयुर्वेद महाविद्यालयाने तयार केलेला आयुष काढा रुग्णांना देण्यात येणार आहे. दिवसातून तीन वेळा जेवण देण्यात येणार असून, त्यात रोज वेगळा मेन्यू असणार आहे.
या सेंटरमध्ये रुग्णांना अल्पदरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांना मास्कपासून स्वातंत्र्य मिळेल, अशी आशा जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी आयुष काढ्याविषयीची माहिती डॉ. सूरजसिंह ठाकूर यांनी दिली. प्रास्ताविक अमित मुथा यांनी केले. कमलेश भंडारी यांनी सूत्रसंचालन केले, तर शैलेश मुनोत यांनी आभार मानले.