मी दादांचा फॅन झालो…

– धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र राज्य

दादांची केबिन सकाळपासून अगदी मध्यरात्रीपर्यंत सुरू असते, दादांच्या अविरत कार्यशैलीची हीच ती प्रेरणा आहे, जी माझ्यासारखे असंख्य तरुण राजकारणात नव्याने काम सुरू करताना शिकायचा प्रयत्न करतात! मी भारतीय जनता पक्षात असताना विविध कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जायचो, त्याकाळी असलेल्या आघाडी सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते. परळीसह बीड जिल्ह्यातील विविध कामानिमित्त नेहमी आमची भेट व्हायची. माध्यमांमध्ये चर्चिले जाणारे आम्ही दोन “पुतणे’ मित्र, असे त्याकाळी म्हटले गेले आणि मी ते जाहीरपणे कबूलही केले. एक दोन भेटींमध्येच मी दादांचा फॅन झालो.

करोनामुळे सध्या माझ्यासह मंत्रिमंडळातले अनेक सहकारी मंत्री आपापल्या जिल्ह्यातून आपले कामकाज चालवत आहेत, मंत्रालयात अगदी 5 ते 10 टक्‍के लोकांच्या उपस्थितीत कामकाज सुरू असले तरी महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून एक मंत्री मात्र सकाळच्या सात पासून मध्यरात्रीपर्यंत मंत्रालयात दिसतात, कोणी असो नसो, त्यांचे कार्य मात्र अविरत सुरू असते; ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा!

माझ्यासारख्या राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला अजित दादांसारख्या माणसाची पाठराखण मिळणे ही त्यातल्या त्यात एक मोठी गोष्ट आहे. कारण “अनंत टीकेचे धनी’ अशीच आमच्या दोघांची ओळख अनेकवेळा माध्यमांसमोर मांडली जाते. दादांच्या अंगी असलेली दूरदृष्टी आणि त्यांचे विकासाचे कार्य समजून घ्यायचे असेल तर बारामतीला किंवा त्यांनी उभ्या केलेल्या पिंपरी चिंचवडला एकदा भेट देऊन तिथे पाहिले पाहिजे. दादांचा कामे करण्याचा धडाका, मोठा जनसंपर्क, प्रशासनावरील मजबूत पकड, त्यांच्यातील धैर्य आणि संयम या अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील, ज्या मी त्यांच्याकडे बघून शिकायचा प्रयत्न करतो आहे.

दादांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने एक किस्सा आवर्जून सांगावा वाटतो. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानशी संबंधित एका महाविद्यालयाच्या ऍडमिशन प्रक्रियेत दादा प्रमुख होते. चार-दोन मार्कांवरून ऍडमिशन न मिळू शकलेली एक विद्यार्थिनी माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्यांची शिफारस घेऊन दादांकडे ऍडमिशन मिळावे यासाठी विनंती करायला गेली. तिला बसवून दादांनी विचारलं, “मार्क कमी आहेत तुझे बाळा, आता मला अमुक व्यक्‍तीने सांगितले, हिला ऍडमिशन द्या, म्हणून मी एकवेळ ऍडमिशन करून घ्यायला सांगतो तुझं; परंतु आपल्याला कमी मार्क असताना, या सीटसाठी असलेला योग्य उमेदवार सोडून तुला ऍडमिशन द्यायचं म्हणजे त्या योग्य उमेदवारावर अन्याय नाही का होणार? तुम्ही पुढील शिक्षण घेऊन जेव्हा समाजाला त्याचा फायदा मिळवून द्याल, त्यावेळी समाज जास्त योग्यतेचा उमेदवार असायला हवा होता, असं नक्‍कीच म्हणेल!’ दादांच्या स्वभावातील हे आशय कधी समाजासमोर आले नाहीत.

मी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आणि दादांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात दादांनी सामाजिक न्याय खात्याला भरभरून निधीची तरतूद केली. करोनाच्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तेव्हा एका तासात सोडून तातडीने निधी उपलब्ध करून दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णयही दादांनीच घेतला, इतकेच नव्हे तर या स्मारकाच्या संनियंत्रण आणि देखरेखीची जबाबदारीही माझ्याकडे असलेल्या खात्याकडे सोपवली. ऊसतोड कामगारांसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली.

विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेत काम करत असताना “धनंजय सत्ताधारी पक्षावर आरोप नक्‍की कर, मात्र ते त्यांनी आपल्यावर केले त्याप्रमाणे व्यक्‍तिगत असू नयेत, तर ते पुराव्यांसह असले पाहिजेत’, असा त्यांचा नेहमीच आग्रह होता. या शिकवणीतून मी महाराष्ट्रातील सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण पुराव्यासह सभागृहात मांडू शकलो याचे श्रेयही अजितदादा यांनाच आहे.

दादा म्हटलं की, आठवतात गेल्या दहा वर्षांतल्या अनेक आठवणी, दादांनी किती संघर्ष केला, दादांनी व्यक्‍तिमत्त्वावर लावण्यात आलेले डाग धुऊन काढण्यासाठी काय काय केलं, आपल्या नावाने गाडीभर पुरावे घेऊन आरोप करणाऱ्यांना ते आरोप कसे खोटे होते हे सिद्ध करून दाखवले, हे सबंध महाराष्ट्राने पाहिलं.

“अजित योद्धा’ असलेल्या “माणूस जीवाभावाचा’ म्हणवणाऱ्या दादांना एकटे पाडून ईडी-बिडीमध्ये अडकवण्याचे अनेक प्रयत्न झाले, त्यादिवशी मी दादांच्या सोबत होतो. राजकीय आयुष्यात अनेक आरोप सहन करून लोकांसाठी काम करायचा प्रयत्न करत असताना द्वेष आणि तिरस्काराने कोणी आपल्याला नाहक खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तर काय वेदना होतात, त्या मीही अनुभवलेल्या आहेत!

दादा आणि मी या नात्यामध्ये एक मजबूत धागा आहे त्या धाग्याचं नाव आदरणीय पवार साहेब! जोपर्यंत ते आमच्या पाठीशी आहेत, असे कोणतेही षड्‌यंत्र हाणून पाडायची ताकत दादांमध्ये आहे. दादा आता आपले एकसष्ठीमध्ये पदार्पण झालंय, आपण माझ्यासारख्या अनेकांचे प्रेरणास्थान आहात, आपण करत असलेलं काम, करोना सारख्या महामारीमध्ये आपण राज्यातील जनतेला दिलेला आधार आम्ही कधीही विसरणार नाही, तुम्ही मंत्रालयात बसून रोज सकाळच्या सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत लोकांसाठी केलेलं काम आम्ही कधीच विसरणार नाही; बस तुम्ही स्वतःची काळजी घ्या… आपल्या हातून कायम सत्कार्य घडो… हा संदेश आदरणीय दादांना या माध्यमातून देतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.