नवी दिल्ली – भारतात तयार झालेल्या करोनावरील कोव्हॅक्सीन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून गेल्या आठवड्यात परवानगी मिळणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया थोडीशी लांबली होती. आता काही तासातच या लसीला परवानगी मिळणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.
संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट व्हॅरीस यांनी सांगितले की, संघटनेची तांत्रिक विषयावरील समिती अभ्यास करीत आहे. सर्व काही सुरळीत चालले आहे. पुढील चोवीस तासांमध्ये या लसीला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे असे त्या म्हणाल्या.
भारतात लक्षावधी नागरिकांनी ही लस घेतलेली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांना बाहेर देशात जाता येत नाही. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने ही लस विकसित केली आहेत. 19 एप्रिल रोजी या कंपनीने मान्यतेसाठी ही लस जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठविली आहे.
आरोग्य संघटनेच्या परवानगीशिवाय जागतिक पातळीवर ही लस उपलब्ध करता येत नाही. गेल्या शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही वेळा मूल्यांकन करण्यासाठी जास्त वेळ लागतो. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणे बरोबर नाही. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहोत.
मान्यतेनंतर निर्यात होऊ शकणार
भारतामध्ये जवळजवळ 100 कोटी लसी नागरिकांना दिल्या आहेत. त्यामुळे भारताकडे आगामी काळामध्ये लसीचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जर मान्यता दिली तर ज्या देशांना गरज आहे त्या देशांना भारत लसीचा पुरवठा करू शकणार आहे. पंतप्रधान कार्यलयाचे याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर ही लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना परदेशात जाता येणार आहे.