डॉ. कोल्हे, आढळराव, बांदल, लांडगे, निकम यांची नावे चर्चेत
शेरखान शेख
शिक्रापूर – सध्या राजकारणाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली असताना शिवसेना व राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असल्यामुळे कोणता नेता कोणत्या गटाचा अशी स्थिती निर्माण झालेली आहे. लवकरच जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभेसाठी नेमका कोण उमेदवार असणार असा प्रश्न नागरिक व मतदारांना पडू लागला आहे.
पुणे जिल्ह्यात शिरुर लोकसभा मतदारसंघ महत्वाचा मानला जात असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेले असते, यापूर्वी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तीनवेळा या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत. मागील वर्षी शिवाजीराव आढळराव पाटील, डॉ. अमोल कोल्हे व मंगलदास बांदल अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता असताना अचानक बांदल यांनी राष्ट्रवादीला पाठींबा देत राष्ट्रवादीच्या प्रचारात आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या डॉ. कोल्हे यांच्याकडून आढळराव पाटील यांचा पराभव झाला, त्यांनतर बांदल हे काही अडचणीत सापडले तसेच शिवसेना पक्षाचे दोन गट पडले. सध्या राष्ट्रवादीचे देखील दोन गट पडले अशी स्थिती असताना आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत.
डॉ. अमोल कोल्हे हे देखील शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा मतदारसंघात काही कमी प्रमाणात दौरे असल्याची स्थिती आहे. परंतु शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना शह देण्यासाठी माजी सभापती देवदत्त निकम हे लोकसभेचे उमेदवार असल्याचे जाहीर केल्याचे बोलले जात आहे. आमदार महेश लांडगे हे देखील भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी इच्छुक असलेले बांदल हे देखील तीव्र इच्छुक असून पक्षातील गटबाजीमुळे एखाद्या पक्षाने उमेदवारी दिल्यास किंवा अपक्ष देखील निवडणूक लढवण्यास बांदल इच्छुक असल्याने ऐनवेळी बांदल आपली भूमिका जाहीर करणार आहे. सध्या बांदल यांचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहे. परंतु सध्याच्या गटबाजीमुळे नेमके कोणाच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडणार आणि कोणाला कोणत्या गटाचा आणि कोणाच्या विरोधाचा फायदा होणार तसेच शिरुर लोकसभेसाठी कोण यावर चर्चेच्या फैऱ्या झडत आहेत. डॉ. अमोल कोल्हे, आढळराव पाटील, बांदल, महेश लांडगे, देवदत्त निकम यांच्यापैकी कोण उमेदवार असणार, याची चर्चा सध्या शिरुर तालुक्यात रंगली आहे.