सातारा(वडूज प्रतिनिधी) :- मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आमदार जयकुमार गोरे, महेश बोराटे, दत्तात्रय घुटुगडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी शुक्रवारी फेटाळला. या निकालामुळे आमदार गोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ते उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 5) सुनावणी झाली होती. त्यावरील निकाल न्यायाधीशांनी राखून ठेवला होता.
याबाबत माहिती अशी, मायणी येथील भिसे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही, ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून, त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात भिसे म्हणून सह्या करणाऱ्या संजय काटकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, आ. गोरे, महेश बोराटे, दत्तात्रय घुटुगडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर बचाव पक्षाच्यावतीने ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. अरुण खोत, ॲड. संदेश गुंडगे यांनी, सरकार पक्षाच्यावतीने साहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक आणि फिर्यादीच्यावतीने ॲड. टी. एस. माळी, ॲड. प्रल्हाद सावंत यांनी काल (दि. 5) युक्तिवाद केला होता. त्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी तिघांचेही अर्ज फेटाळले आहेत. या निर्णयामुळे आ. गोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.