मुंबई – पुढील काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. या निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा दिलाय. तसेच मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दांवरून राजकारण ढवळून काढलं आहे. मात्र राज यांची नवी भूमिका पक्षातील नेत्यांना रुचलेली दिसत नसल्याचं चित्र आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील दोन माजी नगरसेवकांनी फॉर्मात आलेल्या मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला.
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत सिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे. घारीवली, काटई, उसरघर येथील मनसेच्या माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील, मनसे तालुका प्रमुख गजानन पाटील आणि माजी नगरसेवक तथा मनसे जिल्हा सचिव प्रकाश माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.