लाचखोर सहाय्यक फौजदार अटकेत

एसीबीची कारवाई; दोन हजाराची मंथली घेताना पकडले

सातारा, दि. 16 (प्रतिनिधी)

अवैध प्रवासी वाहतुक करण्यासाठी परवानगी देतो असे सांगत ओमणी चालकाला दोन हजाराची मंथली मागणारा शिरवळ पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार चतुर्भुज नारायण चव्हाण (वय 50 रा. शिरवळ) याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

याबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मारूती ओमणी व्हॅनला परवानगी देण्यासाठी चव्हाण याने दरमहा दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने सातारा एसीबीकडे लाच मागणीची तक्रार केली होती.

त्यानंतर एसीबीने शिरवळ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा लावत, तक्रारीची पडताळणी केली. त्यात चव्हाण हा लाच मागत असल्याचे समोर आल्यानंतर एसीबीने गुरूवारी शिरवळ येथे सापळा लावला होता.

त्यात चव्हाण हा तक्रारदाराकडून मंथली म्हणून दोन हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडला गेला. त्यानंतर त्याच्या विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (एसीबी), अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण (एसीबी) यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीचे उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार संजय साळुंखे, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय अडसुळ, प्रशांत ताटे, मारूती अडागळे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.