जयपूर : जयपूरच्या सवाई मान सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या इटालीयन प्रवाशाच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पतीलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या महिलेच्या बडक्याचे आणि रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवल्यानंतर तेथे त्यांना कोरोना झाला असल्यावर शिक्कामोर्तब झाले. यापुर्वी रुग्णालयात घेतलेल्या दोन चाचण्यात वेगवेगळे निष्कर्ष आल्याने हे नमुने पुण्याला सोमावारी पाठवण्यात आले होते.
हे इटालीयन दाम्पत्य 20 जणांच्या गटासह भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सोबत असणाऱ्या अन्य प्रवाशांना विलगता कक्षात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या गटाने मांडवा, जैसलमेर, बिकानेर आणि जोधपूर येथे भेटी दिल्या आहेत. जयपूर विमानतळावर 23 हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, इटालीयन दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यावर अफवांचे पीक उठले आहे.