पुणे -जिल्ह्यातील करोना बाधित संख्येने आज (दि. 10) सकाळीच तब्बल दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील बाधितांची संख्या 8 हजार 509 तर पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील बाधितांची मिळून 10 हजार 394 इतकी संख्या झाली आहे. यातील निम्म्याहून अधिक 5 हजार 575 जण करोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत शहरात नवीन 304 बाधित सापडले आहे तर 271 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आजची बाधितांची संख्या ही जवळपास दोन हजार नमुने तपासणीतील आहे. तर आज दिवसभरात आणखी 1 हजार 949 जणांचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल उद्या येणार आहे. सद्यस्थितीत 2 हजार 528 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयात एकूण 1 हजार 728, ससून रुग्णालयात 153 आणि अन्य खासगी रुग्णालयात 647 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 214 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 43 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 25 नवीन अत्यवस्थ रुग्णांची भर पडली आहे. बाधितांची संख्या वाढल्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींचीही संख्या 8 हजार 509 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू
पुणे शहरात करोनामुळे आज तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये 50 ते 69 वयोगटातील दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. तर जिल्ह्यात हवेली तालुक्यातील 61 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल तर जळगाव येथून आलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.