महिनाभरात सापडले करोनाचे 359 बाधित; पानमळा वसाहतीत 179
पुणे – भवानी पेठ, येरवडा, शिवाजीनगर, कळस-धानोरीतील झोपडपट्ट्यांमध्ये करोनाची साथ आटोक्यात येत आहे, पण आता सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दांडेकरपूल आणि परिसरातील भाग करोनाचा नवीन हॉटस्पॉट बनला आहे. मागील महिनाभरात या परिसरात तब्बल 359 नवीन बाधित आढळून आले आहेत.
दांडेकर पूल भागात सर्वाधिक बाधित पानमळा वसाहतीत आढळले असून अवघ्या दीड आठवड्यांत या भागातील रुग्णसंख्या तब्बल 179 झाली आहे. शहरात करोनाबाधित सापडण्यास सुरू झाल्यानंतर कोथरूड आणि बावधनप्रमाणेच सिंहगड रस्ता परिसरातही ही संख्या कमालीची नियंत्रणात होती.
विशेष म्हणजे, पहिले दोन करोनाबाधित याच क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सापडले असताना 13 मेपर्यंत या हद्दीत अवघे 14 बाधित होते. त्यानंतर या हद्दीतील बाधितांची संख्या मागील महिनाभरात 423 वर गेली आहे. त्यात, आतापर्यंत सर्वाधिक 179 बाधित पानमळा, सुमारे 93 जण जनता वसाहत परिसरात सापडले आहे.
तर 57 जण दांडेकरपूल स.नं 130 येथील आहेत. याच भागात राजीव गांधीनगर येथे 30 बाधित सापडले आहेत. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील एकूण 85 टक्के बाधित नीलायम पूल ते पर्वती जलकेंद्र परिसरात सापडले आहेत. तर उर्वरित रायकर मळा परिसरात सर्वाधिक बाधित आतापर्यंत सापडले आहेत.