CoronaUpdate : छत्तीसगढमध्ये करोनाने नक्षलवाद्यांनाही घेरले

दंतेवाडा  -छत्तीसगढच्या बस्तर विभागात सक्रिय असणाऱ्या नक्षलवाद्यांनाही करोना विषाणूने घेरले आहे. करोनाबाधेमुळे काही म्होरक्‍यांसह अनेक नक्षलवादी आजारी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

छत्तीसगढच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी सुमारे 10 साथीदारांच्या मृतदेहांचे दहन केल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. करोनाबाधेमुळे किंवा अन्नातून विषबाधा झाल्याने त्या नक्षलींचा अंत झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. जंगलव्याप्त भागांत दडलेले नक्षलवादी स्थानिकांशी संपर्क ठेवून असतात.

अनेकदा ते ग्रामस्थांच्या बैठकाही घेतात. त्यावेळी करोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये करोनाचा फैलाव करण्यास नक्षलवादी कारणीभूत ठरू शकतात, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. करोना संसर्गावरील औषधे आणि लसींचे डोस मिळवण्यासाठी नक्षलवादी धडपडत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आवश्‍यक ते उपचार घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी शरण यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे छत्तीसगढमधील स्थिती चिंताजनक बनली आहे. तशात नक्षलवाद्यांच्या हालचाली आणखी डोकेदुखीची बाब ठरत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.