वाघोली : वाघोली-केसनंद रस्त्यावरील एपिक सोसायटी परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली आहे. हा पोलीस कर्मचारी पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असताना करोनाची लागण झाल्याचे समजले.
त्यांचा वाघोली परिसरामध्ये फारसा संपर्क आलेला नसून त्यांना पुणे शहरामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते वास्तव्यास असणाऱ्या वाघोली येथील घर परिसरामध्ये वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली असून त्यांचा घरातील दोघांचे बीजेएस येथे स्वॅब घेण्यात आले आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. वाघोलीत आत्तापर्यंत 16 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 10 जण बरे होऊन घरी परतले असून 6 ऍकटीव रुग्ण आहेत.
पुणे शहर पोलीस दलामध्ये काम करणारे आणि वाघोली वास्तव्यास असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना यापूर्वी करोनाची लागण झाली होती. दोन्ही कर्मचारी ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. आता तिसरा पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह सापडला आहे.