गॅरी कर्स्टन यांच्याकडून धोनीच्या संघाचे कौतुक
मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग अशा अनेक महान खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणे माझ्यासाठी भाग्याचे होते, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू व भारताच्या 2011 सालच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा विजेत्या संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1983 नंतर 28 वर्षांनी भारतीय संघानी 2011 साली पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची कामगिरी केली. या कामगिरीसाठी कर्स्टन यांच्यावरदेखील कौतुकाचा वर्षाव झाला मात्र, हे यश माझे नाही तर ते या महान खेळाडूंसह संपूर्ण संघाने केलेल्या अव्वल खेळाचे आहे, असे मत कर्स्टन यांनी व्यक्त केले.
सचिनचा जागतिक क्रिकेटमध्ये उदय झाला त्यानंतर भारतीय क्रिकेटचा कायापालट झाला. त्याच्याकडे पाहात तसेच त्याच्याकडून प्रेरणा घेत आज विराट कोहली, पृथ्वी शॉ यांच्यासारखे खेळाडू मैदान गाजवत आहेत. सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत संघाने विश्वकरंडक जिंकला नव्हता. मात्र, 2011 साली सचिनचे हे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळेच त्याला सर्व खेळाडूंनी खांद्यावर उचलून मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यावेळी या संघाचा मी प्रशिक्षक होतो याचा खूप अभिमान वाटला, असेही ते म्हणाले.
सचिन, धोनी यांच्याबरोबर काम करता आले. त्यांच्याशी चर्चा करायचो तेव्हा ते प्रत्येक सामन्याचा किती अभ्यास करतात हे लक्षात आले. सचिनच नव्हे तर धोनीदेखील अत्यंत संस्कारी, मनमिळाऊ, शांत पण तितकाच हुशार आहे. त्याला समोरच्या खेळाडूंच्या मर्यादा व बलस्थाने माहीत आहेत त्यामुळेच तो प्रत्येक गोलंदाजाला अचूक मार्गदर्शन करू शकतो. भारतीय क्रिकेटचा जगात दबदबा निर्माण झाला आहे त्याचे श्रेय 2011 सालच्या विश्वकरंडक विजेत्या संघाचे आहे, असेही कर्स्टन यांनी सांगितले.
निर्णय घ्यायला धोनी समर्थ…
महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की पुनरागमन करणार यावर सध्या चर्चा सुरू असली तरी अन्य कोणी त्याबाबत मत व्यक्त करणे योग्य नाही. धोनी स्वतः निर्णय घ्यायला समर्थ आहे. त्याला वेळ द्या सल्ले देऊ नका, असेही मत कर्स्टन यांनी मांडले.