राहाता – राहाता शहरातील संत सावता महाराज मंदिर परिसरातील एक व्यक्ती करोनाबाधित आढळली. त्यामुळे प्रशासनाने संत सावता महाराज मंदिर परिसर सील केला आहे. तसेच बाधित व्यक्तीच्या घरातील व संपर्कातील जवळपास 25 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांची शिर्डी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांना उपचाराची गरज भासेल, त्यांच्यावर उपचार केले जातील तसेच इतरांना साईबाबा संस्थानच्या विलगीकरण कक्षात ठेवले जाणार असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
राहाता शहरातील करोनाबाधित व्यक्ती नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी गेली होती. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रशासनाने तातडीने संबंधित रुग्ण राहात असलेला संत सावता महाराज मंदिर परिसर सील केला. तसेच तेथे औषध फवारणीचे काम सुरू केले आहे. संबंधित व्यक्ती काही दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी ती राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ जाऊन आली असल्याची चर्चा परिसरात होती. त्याचप्रमाणे शहरातील एका खासगी डॉक्टरांकडेही तिने उपचार घेतले असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने या रुग्णाच्या घरातील सहा व्यक्तींबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास पंचवीस लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी ज्यांना करोनाची लक्षणे आढळून येतील, त्यांच्या घशाचे स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित व्यक्तींना साईबाबा संस्थांच्या विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. करोनाबाधित रुग्ण सापडल्याची वार्ता शहरात पसरताच अनेक व्यापाऱ्यांनी तातडीने स्वतःहून आपली दुकाने बंद केली, तर ही व्यक्ती राहात असलेल्या परिसरातील लोकांनी धास्ती घेतली आहे.
प्रशासनाने या परिसरामध्ये औषध फवारणी सुरू केली आहे. शहरात सोमवारपासून सकाळी नऊ ते पाच बाजारपेठ खुली करण्यास परवानगी दिली होती. आता करोनाचा रुग्ण सापडल्याने पुन्हा काही दिवस शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.